भारतीय क्रिकेट संघाने जो पराक्रम ऑस्ट्रेलिया मध्ये केला त्याची प्रशंसा करायलाच हवी. कारण संघातील प्रमुख खेळाडू जायबंदी झालेले असताना, सामन्यात एकवेळ प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झालेले असताना आणि यापूर्वी असं कधीही घडलेले नसताना विजय मिळवणे अभूतपूर्व होते. आपण या पूर्ण मालिकेचा आढावा घेऊया.
सुरूवात संघनिवडीपासून. संघनिवडीतील राजकारण त्याचे बरेवाईट परिणाम भारतीय क्रिकेट साठी नवे नाहीत. नवा आहे सोशल मीडिया आणि त्याचा एक भाग बनलेला प्रकार ट्रोलिंग. अर्थात संघनिवड करणा-यांच अघोषित उत्तरदायित्व त्यामुळे थोडंसं वाढलेलं आहे तरी राजकारण खपून जातं असाच अजूनही अनुभव आहे. तो मोठा स्वतंत्र विषय आहे.
एकदिवसीय मालिका सुरू झाली आणि स्टिव्हन स्मिथला त्याचे हात आणि सूर दोन्ही सापडले. भारतीय गोलंदाजांना मात्र सूर सापडलेला नव्हता. शेवटच्या सामन्यात स्मिथ स्वस्तात परतला आणि दोन याॅर्कर वर पकड असणा-या गोलंदाजांच्या कामगिरीने शेवटचा सामना जिंकला.
झटपट क्रिकेट उर्फ ट्वेंटी ट्वेंटी मध्ये आपण वाकबगार आहोत तरी सूर सापडणे महत्वाचे होते. जडेजाने फलंदाजी केली तसेच काॅनकुशन नियमाचा सकुशल वापर करून ऑस्ट्रेलियाला थोडं बुचकळ्यात पाडलं आणि नंतर चहलने आपल्या गोलंदाजीने अधिकच करामत केली. हार्दिक पंड्याने एकदिवसीय सामन्यातील फाॅर्म कायम राखत ट्वेंटी ट्वेंटी मालिका जिंकून दिली . शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. असा बरोबरीचास पेपर दोन प्रकारच्या सामन्यात सूटूनहीतरी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जात होते.
ते तसे स्वाभाविक होते. कारण एक मागची सिरींज सोडली तर आपण तिथे कधीतरी सामने जिंकलो पण मालिका जिंकलेलो नव्हतो. तसेच इशांत शर्मा हा गोलंदाजीची एक बाजू लावून धरणारा गोलंदाज आधीच जायबंदी झालेला होता. स्विंग गोलंदाजीची मदार ज्यावर असते तो भुवनेश्वर ही तंदुरुस्तीशी झगडतच आहे, आयपीएलनंतर पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला. तरी आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत ही गेल्या काही वर्षातील जमेची बाजू . उमेश यादव, महंमद शामी, जसप्रित बुमराह यांची गोलंदाजी अर्थातच धारदार आहे. अर्थात सर्व फिट असले की मैदान, पिच, प्रतिस्पर्धी संघातील कच्चे दुवे या सर्वाचा विचार करत संघ निवडताना कर्णधाराकडे स्वातंत्र्य असते. पण दुखापत झाली तर पर्याय कमी उरतात. भारतात सामने असले की पटकन नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. दौ-यावर असताना वातावरणाशी जुळवून घेणे, मॅच प्रॅक्टीस हे सर्व झाल्यावरच संघात स्थान मिळते. आणि त्यात कोविड मुळे आयसोलेशनचे नियम. अशा पार्श्वभूमीवर जर कोणाला दुखापत झाली तर नवीन कोणाला बोलावणार? अननुभवी पर्यायातूनच संघनिवड करावी लागणार. त्यात पहिल्या दोन सामन्यासाठी रोहित शर्मा नसणं, पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली कौटुंबिक कारणासाठी रजेवर जाणार होता, त्यामुळे बहुतेक धुरिणांनी आधीच ऑस्ट्रेलियाला मालिका ४-० ने बहाल केली .
पहिल्या कसोटीत इतकं गचाळ क्षेत्ररक्षण करूनही अधिक काळ भारताचेच नियंत्रण होते. थोडी विकेटवर किंमत लावली असती आणि काही झेल घेतले असते तरी तोही सामना आपणच जिंकला असता. पण फुटबाॅल सामन्यात जसं बाॅलवर अधिक वेळ कंट्रोल पासिंग करत ठेवले तरी निर्णायक क्षणी गोल मात्र विरोधी संघाने केला की जसा सामन्याचा निकाल फिरतो अगदी तसंच भारतीय फलंदाजांना बेसावध पकडले कमिन्स, हेजलवूड आणि स्टार्कने .तिघंही टाॅप टेन गोलंदाजात येतात, कमिन्स तर शीर्षस्थानी सर्वांच्या बराच पुढे आहे. मला वाटलं भारतीय फलंदाजांची झोप वगैरे नीट झाली नसावी. कारण माझी झोप झालेली नव्हती. माझी याबाबतीत अशी डोळस व पुराव्याने शाबित अशी श्रद्धा आहे की जेव्हा मी कोणतीही काम व्यवस्थित करतो तेव्हा आपला संघ व्यवस्थित खेळतो. त्यामुळे हे धरूनच चला की अतर्क्य अविस्मरणीय विजय मिळाले की तेव्हा मी प्रचंड मेहनत घेत असतो. मला वाटतं हे मी चोवीस तास करू शकायला हवे . सर्व भारतीयांसाठीही हे अगदी असेच आहे. आपली इच्छाशक्ती आणि कार्य यांना आपल्याला कल्पना नाही एवढे महत्व निश्चितच आहे. तरी क्रिकेटचा विचार करता आपली सलामीची जोडी स्वस्तात बाद झाल्याने येणा-या दबावाने आपला डाव गडगडला.
तसा पृथ्वी वाट चांगला फलंदाज आहे, पण आपल्याकडे व्यक्तिपुजेचे आणि तुलनेचे एवढे स्तोम आहे की प्रत्येकाला पुढचा सचिन वगैरे म्हणून त्याला हवेत न्यायचं आणि अपेक्षांच ओझं वाढवत अधांतरी तरंगत ठेवायचं. असं झाल्यावर आपटणारच ना. तर हा इथल्या क्रिकेट प्रशासन व शौकीन या सर्वांसाठी धडा आहे. साहजिकच पुढील सामन्यात नवीन जोडी शोधावी लागणार होती. परंतु सत्तर ऐंशी धावा झाल्या असत्या तर ठीक होते, पण नीचांकी धावसंख्या नोंदवली गेल्याने नवेजुने क्रिकेट विश्लेषक तुटून पडले - ' म्हणलो नव्हतो व्हाईटवाॅश होणार आहे. विराट ही घरी येतोय आता काही खरं नाही.
तसं जे या भारतीय संघाला जवळून बघतात किंवा त्याची माहिती ठेवतात ते अपेक्षा ठेवून होते की भारत याला प्रत्युत्तर देईल अर्थात तरीही ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्याची शक्यता जास्त आहे हे त्या पराभवानंतर कोणीही स्वीकारेल, दुसरे मत धाडसाचे किंवा वेडेपणाचे ठरवले गेले असते. तरी आपल्यासहित काही लोकांना अशी वेडी आशा होती की अजूनही आणि इथूनही आपण जिंकू शकू. पण आपल्यापेक्षाही जे प्रत्यक्ष खेळले त्यांच्या भावना आणि प्रतिसाद महत्वाचा आहे
अर्थातच खेळाडू दुःखी होते. ' It's just an hour's bad play' ही प्रतिक्रिया बोलकी होती . आम्ही चांगले खेळलो ( क्षेत्ररक्षण वगळता) फक्त एक तास प्रतिस्पर्धी भन्नाट खेळले एवढाच बोध त्यांनी घेतला. अशा वेळी तुम्ही कोसळले पाहिजे अशी सामान्य किंवा इतरांची धारणा असू शकते. पण काय करायचं हे तुम्हालाच ठरवायचं असतं. भारतीय संघाने लढण्याचा मार्ग स्वीकारला. Rest is History!
( क्रमशः)
Comments
Post a Comment