साखरेचे खाणार


 साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे . म्हणजे गोडधोड पदार्थ सहसा सणावारालाच खायले जायचे, नाही म्हणायला चहातल्या साखरीत कधी काटकसर उधारीवर उधारी वाढूनही कधी झाली नाही अशी घरोघरी मातीच्याच चुलीची अवस्था तुम्हाआम्हाला काय नवीन आहे?


आपले राऊळंमंदिरं सुद्धा उंचच उंच डोंगरात. फेरफटका झाला की शरीर काटक आणि आरोग्य सुद्धा मोकळ्या हवेने मस्त राहते.  थकूनभागून आलो की जिभेवर गोड प्रसाद, म्हणूनच साखरेचे खाणार त्याला देव देणार असं म्हणत्यात.  

तसंही साखरेन शरीराची झीज भरून निघती. 

आता यंत्रयुगात अंगमेहनत काही जणांची कमी झाली तर साखर बी मापातच घ्यावी. 


त्याच बरोबर साखरेचे खाणार त्याला ऊसतोड कामगार देणार हे बी सर्वांनी जाणीव ठेवणं आवश्यक.  बीड आणि बीडला लागून नगर जिल्ह्यातला पट्टा ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. 

शेतीतलं उत्पन्न एकरकमी हातात येईल न येईल  तोडीचे काही का होईना हाती येतात म्हणून  अनेक परिवारच्या परिवार ऊसतोडी साठी काही महिने घरापासून दूर असतात.  

तसंच अनेक घरांत एक जोडी वारीला निघती तर दुसरी ऊसतोडीला.  

ऊसतोडीला ' बेलापूरला जाणं ' असा वाक्प्रचार आमच्याकडं खासकरून जुन्या पिढीत प्रचलित आहे.  ते आपल्या डालडावर्गीय कोलगेट सारखं झालं ना.  म्हणजे  सगळ्यात पहिला सहकाराच्या बी आधी खाजगी साखर कारखाना उभा राहिला बेलापूरला तर ते शब्द झाला रूढ.


मग आता ऊसतोड कामगार म्हणजे तसे अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूरच, आधीच उत्पन्न तुटपुंजे त्यात लेकराबाळांच्या शिक्षणाकडं कसं लक्ष देणार? लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे  दुर्दैवाने आपल्याला सोडून गेले. त्यांच्या नावाने महामंडळ तर सुरू झाले पण मागील सरकारच्या अंतर्गत स्पर्धेत  त्याला पाहिजे ती गती घेता आली नाही अगदी सध्याचे सरकार महाज्योती कडे दुर्लक्ष करत आहे तसंच. 

आताशी घोषणा झाली वसतिगृहाची पण ती पुरेशी नाही तसेच त्यात माझ्या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर ऊसतोडीला कुटुंब जातात तिथं वसतिगृहाची काही तरतूद नाही या गोष्टीकडे सरकारने लक्ष घालावे.  उगी अल्पसंतुष्ट होऊन ताई अन् भाऊ म्हणून उड्या मारू नये आपल्या मागण्या पुढं कराव्यात. हे काही   लिहिण्याची गोष्ट नाही आमदार खासदार यांना समोरासमोर असेच आपण वागतो, सन्मान राखतो पण काम करा नुसतं उदा उदा करायला साखरेचे खाणार ला साखर देणारे काही देव नाही आहात. 

आणि साखरेचे खाणार त्याला ऊसतोड कामगार देणार तर समाज आणि नेतृत्व मिरवणारांनी परतफेड करावी, फक्त बोळवण करू नये. 

साखरसम्राट झाले बहु पण सहकाराचे काय हे आपण पाहतच आहोत. जनता जोपर्यंत व्हीआयपी ट्रीटमेंट देईल तोपर्यंत असंच होणार.  नुसतं राजकारण्याला कुठं नाव ठेवता, तुम्ही कशाला पुढं पुढं करता; अरे आपला हक्क आपण मागितलाच पाहिजे , कार्य करून कर्तव्य  निभावले तर जरूर धन्यवाद देऊ. 

Comments